कोरोना आणि डॉक्टरांचं हौतात्म्य ! - डॉ सचिन लांडगे.

कोरोना आणि डॉक्टरांचं हौतात्म्य !


- डॉ सचिन लांडगे.


कोरोनवर लढण्यासाठी प्रशासन उशिरा का होईना पण सज्ज होतेय.. नुसतं लॉकडाऊन डिक्लेअर करून भागत नसतं, हे हळूहळू शासनाच्या लक्षात यायला लागलंय..


समजा तुम्ही सैनिक आहात, सरकारने तुम्हाला हातात चाकू देऊन बॉर्डरवर लढायला पाठवलं, तर काय होईल? समोर शत्रूकडे मशीनगन आणि रणगाडे आहेत, आणि तुमच्या हातात चाकू आहे! काय होईल?
उत्तर सरळ आहे.. तुम्ही मरणार!!
नंतर लोक तुम्हाला हुतात्मा म्हणणार, सरकार तुमच्यासाठी बंदुकांची सलामी देणार, पण तुम्ही मात्र एक स्वस्त मरण मेलेले असणार!
देशभक्तीच्या भरमसाठ शपथा देऊन देश तुम्हाला तिकडे पाठविणार असेल तर ते तुम्हाला लढायला नव्हे, तर मरायला पाठविताहेत हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे..


तसंच डॉक्टरांसोबत होतंय.. कोरोना साथीत उपचार बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचं नोटिफिकेशन सरकारनं काढलंय..  वरवर ते योग्यच आहे, या संकटाचा सामना करण्यासाठी सगळ्यांनी मिळून उभा राहिले पाहिजे, पण मग त्यांच्या सुरक्षेचं काय? देता येईल का प्रत्येकाला PPE kit? सोशल मीडियाने अगोदरच डॉक्टरांना हिरो केलेलं आहे.. पण टाळ्या आणि थाळ्या वाजवायला लावून अजूनच स्वतःची लाज घालवून घेण्यापेक्षा त्यांच्यावरच्या परिस्थितीची दखल घेऊन त्यानुसार पावले उचलली तर बरं होईल, असं मला वाटतं..


समजा, ओपीडी पेशंट पाहत असलेल्या डॉक्टरकडे एखादा कोरोना बाधीत रुग्ण आला ज्याला काहीच symptoms (लक्षणं) नाहीत, तर तो त्या डॉक्टरला तर धोक्यात टाकेलच, पण त्याच्या कुटुंबियांना आणि त्या डॉक्टरांनी त्यानंतर तपासलेल्या प्रत्येक रुग्णालाही तो धोक्यात टाकेल, हे समजायला फार अक्कल लागत नाही!!
पण सरकारला (आणि समाजालाही) हे समजूनच घ्यायचं नाही, असं दिसतंय.. पेशंट तपासताना लागणारे ग्लोव्हज, गाऊन आणि N95 मास्कस् यांचा प्रचंड तुटवडा आहे, PPE kits तर मिळतच नाहीत, आणि  सरकार म्हणतेय, स्टेज4 मध्ये सार्वजनिक सेवा नाही दिलीत किंवा तुमचे दवाखाने बंद ठेवले तर बघा, तुमची डिग्रीच काढून घेऊ, आणि जेलमध्येही टाकू!!
अशा वेळी कोणता डॉक्टर टाळ्या आणि थाळ्या ऐकून खुश होईल?!!


शहरी भागात ही परिस्थिती आहे, ग्रामीण भागाचा तर कल्पनाही न केलेली बरी.. नाकाला रुमाल बांधून काम करताहेत प्रत्येक डॉक्टर, सिस्टर, कंपाउंडर.. फडकं गुंडाळून आशा वर्कर घरोघर फिरताहेत रजिस्टर घेऊन.. सगळ्यांना माहिती आहे असं कापड गुंडाळून घंटा फरक पडत नाही, पण तेवढंच मानसिक समाधान! साध्या मास्क चे रेट ही अव्वाच्या सव्वा झालेत, आणि प्रत्येकजण परिस्थितीचा फायदा उठवून लुटायचं बघतोय! गावातले प्रतिष्ठित आणि गुंड लोक तपासणीसाठी डॉक्टरांवर दबाव टाकत आहेत, दिवसा बाहेर फिरू शकत नाही म्हणून रात्री अपरात्री येऊन आपल्या साध्यासाध्या तक्रारींसाठी डॉक्टरला उठवत आहेत, इमर्जन्सी नसलेली ऑपरेशन करायला लावत आहेत.. असो..


बरं,  हॉस्पिटल काय फक्त डॉक्टरांवर चालत नाही.. रेसिडेंट डॉक्टर्स लागतात, नर्सेस लागतात, वॉर्डबॉय लागतात, सफाई कर्मचारी लागतात.. त्याचं काय?  ही लोकं कामावर यायला तयार नाहीत..  माझ्या आजूबाजूच्या जवळपास सगळ्या हॉस्पिटलमध्ये निम्म्याच्या वर स्टाफ पळून गेला आहे.. आणि जे येताहेत त्यांना वेगवेगळी अमिष दाखवून कसंबसं सांभाळावं लागतंय.. (यातला प्रत्येकजण insensitive आहे, असं नाही, पण वाहतूक व्यवस्था नसल्यानं त्यांना नेण्याआणण्या पासून त्यांच्या राहण्याची, जेवण्याची, पैशांची व्यवस्थाही हॉस्पिटल्सना करावी लागत आहे..) प्रत्येकाला हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आपल्या नातेवाईकाची काळजी अन भीती आहे.. 'भले हॉस्पिटलमधली तुझी नोकरी गेली तरी चालेल, पण तू आधी घरी ये असं' प्रत्येक आईबापाला वाटतंय.. आणि PPE kits विना आपण स्वतःसह आपल्या स्टाफला देखील कोरोनाच्या खाईत लोटतोय हा गिल्ट देखील बऱ्याच डॉक्टरांना पण आहे..


गेल्या आठवड्यात वाघोलीत एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेला रुग्ण नंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाला.. आता ते हॉस्पिटल तर लॉक केलेयच, पण त्या हॉस्पिटलच्या ड्युटी डॉक्टर्स आणि सिस्टर्स ज्या सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होते, त्यां लोकांनी 24 तासात फ्लॅट खाली करण्याची धमकी दिलीय.. ती हीच लोकं आहेत, जी इतक्या दिवस कोरोनासोबत लढणाऱ्यांना देव मानत होते, आणि सरकार ह्यांना त्यासाठी थाळ्या वाजवायला सांगत होते!! अजून आठवडा पण नाही झाला त्यांनी थाळ्या वाजवून, पण आता स्वतःवर आलं की लगेच ते हॉस्पिटल स्टाफ समाजाला नकोसेच झालेत!! भिलवाडाचं उदाहरण ही ताजं आहे..


एखाद्याला देव म्हणायचं, देशभक्त म्हणायचं, त्याची आरती करायची, थाळ्या वाजवायच्या आणि मग त्याच्याकडून हौतात्म्य मागायचं, हा आपला सामूहिक गुणविशेष आहे.. 


सरकारने आधुनिक शस्त्रे न देता बॉर्डरवर पाठवलेला सैनिक हुतात्मा नसतो होत, तर त्या सैनिकाचा आपण बळी घेत असतो.. ऑक्सिजन मास्क न देता गटारात उतरायला लावून आपण त्या सफाई कर्मचाऱ्याचा बळी घेत असतो.. आणि कसलेही प्रोटेक्शन किट न देता डॉक्टरला साथीच्या तोंडावर उभा करून आपण त्या डॉक्टरलाही मरायला सोडत असतो, हे साधारणतः किती हजार वर्षांनी आपल्याला समजणार आहे!??


गेली 20 वर्षे झालं कोणतंही युद्ध झालं नाही, तरीही आपण संरक्षणसिद्धता ठेवतो की नाही? फायटर प्लेन्स, टॅन्कस् , बंदुका दारुगोळा यांची सज्जता ठेवतो ना.. तसं या साथीचे रोग, महामारी, यांसाठी सरकार कितपत सिद्ध होतं सांगा बरं मला? बीजेपी असो किंवा काँग्रेस असो, सार्वजनिक आरोग्याबाबत परिस्थिती सारखीच असते..  निदान चीन मध्ये कोरोना धुमाकूळ घालत असताना तरी किती कोटी PPE kits , N95 मास्क, व्हेंटिलेटर्स, औषधे खरेदी करून तयार होते? तेंव्हा सुद्धा आपण जागे झालो नाहीत, तेंव्हा देखील आपल्या अन मीडियाच्या प्रायोरिटीज मंदिर, इलेक्शन आणि CAA च होत्या.. 'कोरोना भारतात आला तर काय?' हे अजिबात आपण सिरियसली घेतलं नाही.. 'लोकं ऐच्छिक गोष्टी ऐकत नाहीत' हे काय सरकारला माहिती नाही काय? हातावर quarantine चा शिक्का मारून समाजात सोडलेली लोकं पार्ट्या करत फिरले, हा त्या लोकांचा एकतर्फी दोष थोडाच आहे!?  त्याबाबत कुठलंही ठोस आपत्तीव्यवस्थापन नाही, तिकडून येणाऱ्या नागरिकांना सक्तीचं quarantine नाही.. Plan A, Plan B, Plan C नाही.. उलट त्या जनता कर्फ्युचाही इव्हेंट केला, आणि मग सगळं गळ्याशी येणार असं दिसलं तेंव्हा बसले लॉकडाऊन करून!
खरंतर लॉकडाऊन ही शेवटची स्टेप असायला हवी, पण ती आपल्याला पहिलीच करावी लागते, यातच सगळं काही आलं!


जाऊ दे.. ही वेळ चुका दाखवून भांडायची नाही.. सरकार जे काही करेल जनतेच्या भल्यासाठीच आहे, आणि त्यांच्या प्रयत्नांना डॉक्टर म्हणून आमचीही साथ असेल, पण निदान आपल्या समस्या आणि कळकळ सरकारपर्यंत पोहोचावी, आणि समाजानेही आत्मपरीक्षण करून आम्हाला साथ द्यावी, आमच्याकडून हौतात्म्य मागत आम्हाला मरायला सोडू नये, हीच अपेक्षा!!


जय हिंद ।


**